सत्याचे आकलन
आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या श्रद्धा, आपले गुरू, आपले संत, आपले ग्रंथ, आपल्या देवता, विचारवंत, वैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ हे सर्व आपल्या पूर्वीच्या परंपरा आहेत, ते सर्व भूतकाळ आहे, त्या मधून आपली जाणीव विकसित होत असते.
जेव्हा पूर्वीची जाणिव नसते तेव्हा काहीही नसते आणि तेच सत्य असते.
जाणिवेच्या पलीकडे ईश्वरा सारखे काहीतरी असावे हि सुद्धा एक कल्पना आहे आणि म्हणून ती कल्पना सुद्धा आपल्या पूर्व संस्कारांचा भाग आहे.
जो पर्यंत एखादी व्यक्ती या पूर्व संस्कार मधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ती त्या संस्कारांचा भाग बनून राहते, ती त्या अज्ञानाचा भाग बनून राहते आणि परिणामी त्या मधील दुःखाची भागीदार बनून राहते.
सर्व पूर्व श्रद्धा हे फक्त आपले मानसिक संस्कार आहेत त्यामध्ये तथ्य नाही याचे ज्याला खोलवर आकलन होते तीच व्यक्ती संस्कारांच्या जाळ्यातून मुक्त होते.
सुसंवादी: फार सुंदर प्रकारे शब्दात मांडले आहे. अजून किती सोपे करुन सांगणार? धन्यवाद.
आकलन हे आपले स्वतःचे असते आणि ते भाषांतर करून समजत नाही.
आपण ज्या श्रद्धांना अपार महत्त्व देत असतो ते अज्ञान आहे, त्यात काही अर्थ नाही असे कोणीतरी सांगावे लागते किंवा अपार दुखानंतर त्याची प्रचिती येते आणि त्या नंतर उलटा प्रवास सुरू होतो, स्वतःचे स्वतःस आकलन होवू लागते.
आपल्या श्रध्दा मुळे आपणास दुःख होत असते अन्यथा दुःख हे अस्तित्वात नसते. याचे आकलन आपणास स्वतः होणे आवश्यक आहे, इतरांनी सांगून ते उमजत नसते.
जर विवेक बुद्धी (intelligence) असेल तर लगेच आकलन होते आणि विवेक बुद्धी नसेल तर त्यासाठी मग दुःखातून जावे लागते.
एखाद्या कडे विवेक हि नाहि, दुःख हि नाहि तर तो नक्कीच अज्ञानात जीवन जगत असतो. आणि त्याचे आकलन त्याला होत नसते.
ऐश्वर्य, सुख, कला, साहित्य, क्रीडा, व्यवसाय, नोकरी, समाज, कुटुंब इत्यादी जे मनाला हवे असते ते सर्व अज्ञानात ठासून भरलेले असते.
जोपर्यंत ते मिळत नाही तो पर्यंत मनाला त्याची हाव निर्माण होत राहते, आणि मन त्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. फुल ना फुलाची पाकळी ते मिळवीत असते. आणि जोपर्यंत ते मिळत असते तो पर्यंत मन ते सोडत नाही.
जेव्हा सुखासीन मनाला त्याच्या अज्ञानी मानसिक जगतातील एखादा दुःखाचा फटका बसतो तेव्हा त्याला ते सहन होत नाही. मग ते त्या अज्ञानात ज्ञानाचा शोध घेवू लागते. कितीही शोध घेतला तरी अज्ञानात ज्ञान सापडू शकतं नाही. मन अधिक दुःखी होते, कासावीस होते तेव्हा त्याला कदाचित आकलन होवू शकते की अज्ञानी संसारात ज्ञान असणे शक्य नाही.
आणि केवळ हे आकलन म्हणजेच सत्य आहे त्या पलीकडे काही नाही.




Comments