top of page

वर्तमानात जिवन कोण जगत असते? आपण की आपला भूतकाळ?

Apr 23, 2023
3 min read

प्रत्येकाला त्याच्या जीवनात आनंद हवा असतो. परंतु जीवन नेमके काय आहे याचा कोणीही गंभीरतेने विचार करत नाही. जीवनातील प्रत्येक गोष्टींकडे सखोल दृष्टीने पाहणे म्हणजे जीवन गंभीरतेने जगणे होय. जी व्यक्ती जितकी जास्त गंभीर असते तितके त्याचे जगणे परिपक्व असते.


परिपक्वता तेव्हाच शक्य असते जेव्हा स्वतःच्या खऱ्या अस्तित्वा बद्दलची खरी समज आलेली असते. ती समज येण्यासाठी वेळ काढावा लागत नाही की कोणती साधना करावी लागत नाही. काही साधना करावी लागणे म्हणजे ती जुन्याची उजळणी होय, उजळणी म्हणजे गंभीरता नव्हे आणि त्याने परिपक्वता शक्य होत नाही. म्हणून गंभीरपुर्वक जीवनातील प्रत्येक घटनेकडे लक्ष असेल तर ते लक्ष हेच खरे ध्यान बनते आणि ते ध्यान त्वरित परिपक्वता आणि समज आणते.


आपण प्रत्येकजण जीवन जगत असताना आपली स्वतःची ओळख म्हणून एक प्रतिमा बनवीत असतो तसेच जीवनातील इतर व्यक्ती आणि इतर सुख दूखांच्या सुद्धा प्रतिमा बनवीत असतो. या प्रतिमा भूतकाळात बनविल्या गेलेल्या असतात. प्रत्यक्ष व्यक्ती आणि घटना खऱ्या असतात परंतु त्यांच्या मानसिक प्रतिमा भूतकाळातील असतात! प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटना पाहताना आपले मन त्यांना त्यांच्या भूतकाळातील प्रतीमांशी जोडत असते. म्हणजे आपण प्रत्यक्ष वर्तमानात असताना आपले मन मात्र भूतकाळातील त्यांच्या प्रतिमा न्याहाळीत असते! भूतकाळातील प्रतिमा न्याहाळीत असताना मनाचे अवधान वर्तमानात राहू शकत नाही आणि त्यामुळे आपण वर्तमानाशी जोडले जावू शकत नाही. भूतकाळातील प्रतिमा शिवाय आपले मन व्यक्ती किंवा घटना ओळखू शकत नाही, आणि त्यामुळे मन वर्तमानात येऊ शकत नाही. वर्तमान प्रत्यक्ष अनुभव करता येत नसल्यामुळे मन वेगळ्याच कल्पना रंगवू लागते आणि आपण मनाच्या या भ्रामक कल्पना मध्ये जीवन जगत राहतो. मनाच्या पडद्यावर या भ्रामक कल्पना सतत त्यांचे खेळ खेळत राहतात त्यामुळे खरे जीवन अनुभव करणे अशक्य होऊन जाते.


मन, अहंकार, मी हे सर्व एकच आहेत, ते आपल्या अस्तित्वाचे मानसिक प्रतिनिधी आहेत. हे मानसिक प्रतिनिधी मनातील विचारातून निर्माण होत असतात. विचार असतील तर ते असतात, विचारशून्य अवस्थेत ( गाढ झोप ) ते नसतात. घटना घडल्या नंतर त्याच्या प्रतिक्रिया स्वरूपात विचार सुरू होतात, म्हणजे आपले सर्व विचार हे भूतकाळातील असतात! भूतकाळ म्हणजे जिवंतपणा नसून ती मृत अवस्था असते. या मृत भूतकाळातील विचारांचा प्रतिनिधी असणारा आपला मी हा सुद्धा जिवंत नसून तो मृत अवस्थेतील असतो !


मी स्वतः हा भूतकाळातील द्रष्टा आहे आणि त्याला जे काही समजते ते सर्व मेंदू मधील भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांच्या स्मृती म्हणजे आठवणी असतात. द्रष्टा मी आणि त्याचे दृष्य म्हणजे स्मृती मधील आठवणींच्या प्रतिमा असतात, हे दोन्ही स्मृतींचे भाग असतात, भूतकाळातील असतात, ते एकच असतात फक्त वेगवेगळे भासतात.


जेव्हा आपण पूर्वीचे विचार न करता फक्त समोरील व्यक्ती किंवा घटना यांना नव्याने ते जसे आहेत तसे पाहू लागतो तेव्हाच आपण जिवंत पहात असतो. यासाठी मन विचार शून्य हवे असते, शांत हवे असते. आपल्या आसपास साप फिरत असेल तर आपण जसे अतिशय सतर्क राहतो तसे जीवन जगताना सतत सावधान असायला हवे तरच मन शांत होऊ शकते. पूर्व स्मृती न आठवता फक्त वर्तमान जसा आहे तसा स्वीकार करत जगताना मन सहजपणे शून्य / शांत होत जाते.


ज्यांना दृष्टा आणि दृष्य हे एकच आहेत म्हणजे मी, मन, अहंकार आणि त्यांच्या मानसिक कल्पना हे एकच आहेत याचे आकलन होत नसते त्यांचा मी स्वतःला नेहमी दृष्याहुन वेगळा समजत राहतो. यामुळे दृष्टा आणि दृष्य यामध्ये विसंगती निर्माण होत राहते, त्यातून जीवनात संघर्ष निर्माण होत राहतात, दुःख निर्माण होत राहते. या दुष्ट चक्रात सर्वजण भरडले जात असतात.


दुष्ट चक्रात अडकलेल्या जीवांचे जीवन नेहमी एकटे पणाच्या भीतीने ग्रासलेले असते. भीतीपासून मनाला बाहेर काढण्यासाठी मन सतत जोडीदाराच्या आनंदाच्या शोधात राहते. जे काही सुख प्राप्त होत असते ते टिकेल काय याची परत भीती निर्माण होत राहते.


खरे सत्य प्रेम हे जेथे सुख, आनंद, इच्छा तृप्ती यांच्या आशा निराशा नसतात तेथेच असते. सत्य अवस्थेतील प्रेमाचा शरीर संबंध, सुख, इच्छा, वासना यांच्याशी सुतराम संबंध नसतो.



Comments


©2022 वियोद्ध द्वारा. Wix.com सह अभिमानाने तयार केले

bottom of page