धर्म आणि जातीचे सत्य
प्राचीन काळी भारतासह इतर सर्व देशात आता सारखी धर्म हि संकल्पना अस्तित्वात नव्हती. पूर्वीच्या साहित्यात धर्म हा शब्द कर्तव्ये, नीतिमत्ता, सन्मार्ग अशा अर्थाने वापरला जात असे.
उदाहरणार्थ अहिंसा परमो धर्म म्हणजे सर्व मानव समाजाने एकत्रित गुण्या गोविंदाने राहण्या साठी अहिंसा हीच श्रेष्ठ नीतिमत्ता, श्रेष्ठ कर्तव्य, श्रेष्ठ मार्ग समजायला हवा आहे.
आदिमानव जसा प्रगत होऊ लागला तसे त्याने दगडी हत्यारे, अग्नी, पशुपालन, शेती इत्यादी शोध लावले आणि आपले जीवन अधिक सुरक्षित आणि अधिक समृद्ध केले. सुरक्षित जीवनासाठी त्याने पाणी जेथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असे तेथे वस्ती करण्यास सुरुवात केली. अशा मानवी वस्तीमध्ये साधारण शंभर एक माणसे असायची.
वस्ती मधील सर्व माणसांनी एकमेकांशी कसे वागायचे याचे नियम बनवीले गेले आणि त्या नियमांची अंमबजावणी करण्यासाठी अनुभवी लोकांची पंच समिती नेमलेली असायची. वस्तीचे नियम मोडणाऱ्या स्त्री पुरुषांना दंड म्हणून वस्तीच्या वेशी बाहेर बहिष्कृत केले जायचे. वेशी बाहेर राहणारे हे स्त्री पुरुष वेश शब्दावरून वैश्य आणि वेश्या या नावाने ओळखले जाऊ लागले. वेशीच्या आतील समाजास शेती आणि गुरे यांची मालकी असायची परंतु वेशी बाहेरील लोकांना कोणताही आधार नसे. वेशी बाहेरील लोकांनी स्वतःच्या उपजिविकेसाठी व्यापार आणि मनोरंजन हे नवीन व्यवसाय सुरू केले. नवीन व्यवसायास संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संरक्षण यंत्रणा तयार केली.
शेती, पशुपालन, कारागिरी, व्यापार, मनोरंजन, संरक्षण हे मानवी गरजेतून निर्माण झालेले वास्तविक जीवनावश्यक असे व्यवसाय होते. आधुनिक कंत्राटदार जसे विविध मजुरांना एकत्रित करून आपला व्यवसाय उभारतो तसा या सर्वांना एकत्रित करून पंच समिती आपले गाव स्वयंपूर्ण करीत असत.
कष्ट, मेहनत, ताकद आणि कौशल्य यांच्या सहाय्याने समाज आपला उदरनिर्वाह करीत असे. कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायाचे प्रत्येक पिढीने संरक्षण आणि संवर्धन केल्याने त्यामध्ये त्यांची मक्तेदारी ठरत गेली. प्रत्येकाच्या व्यवसाय अनुसार त्याचा सामाजिक दर्जा ठरत असे आणि कालांतराने त्यातून जाती निर्माण होत गेल्या. प्रत्येक जातीची कुटुंबे त्यांचा वंश परंपरागत व्यवसाय करीत असत आणि एकमेकांना सहाय्य करीत जीवन जगत असत. प्रत्येक कुटुंबे आणि समाज त्यांच्या पूर्वजांची आठवण कायम राहण्यासाठी त्यांची कुलदेवता, ग्रामदेवता या स्वरूपात पूजन करीत असत. वर्षातून एकदा कुल देवतांच्या समोर रात्रभर गोंधळ जागरण करून नव विवाहितांची सामूहिक लग्ने लावली जात असत.
परंतु काही लोकांनी नैसर्गिक आपत्ती, व्यवसाय वृद्धी, परकीय आक्रमण या पासून संरक्षण आणि संवर्धन यासाठी नवीन श्रद्धेच्या संकल्पना निर्माण केल्या. त्या कल्पना त्यांनी इतरांच्या माथी मारल्या. त्यांनी आपल्या कल्पनेतून स्वर्ग आणि तेथील ईश्वराची संकल्पना निर्माण केली आणि स्वर्गातील ईश्वराची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संरक्षण प्राप्त होते अशा कथा त्यांच्या संप्रदायातील लोकांनी प्रसारित केल्या. स्वर्गातील ईश्वर कोणाच्याही अनुभवात येत नसे म्हणून त्या ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून प्रेषित, गुरू आणि त्यांचे ग्रंथ यांचे स्तोम निर्माण होत गेले आणि त्यांचे विविध संप्रदाय नंतर निर्माण होत गेले.
पारशी, ज्यु, वैदिक हे असे संप्रदाय मध्य पूर्व आशिया खंडात प्रथम निर्माण झाले होते. पर्शियन साम्राज्यात पारशी संप्रदायास राजाश्रय प्राप्त झाला आणि राजा आणि गुरू यांच्या युतीने दोघांचा जास्त फायदा होत गेला. राजा हा स्वर्गातील ईश्वराचा अवतार आहे असे गुरू आणि त्यांचा संप्रदाय सांगू लागला आणि त्या दोघांसाठी व्यापारी वर्गाने नवनवीन उत्पादने, व्यवसाय निर्माण केले. राजा, संप्रदाय आणि व्यापारी यांच्या संगनमताने नंतर सुसंघटित धर्म निर्माण होत गेले. कलाकारांनी स्वर्गातील ईश्वराची प्रतीके आणि मिथके बनविण्यात त्यांना मोलाची साथ दिली होती.
पारशी, ज्यु, वैदिक या प्राचीन संप्रदाय मध्ये धर्मांतर स्वीकारले जात नाही, त्यांची वंश शुद्धता कायम राहण्यासाठी त्यांना ते करणे भाग असते. नंतर निर्माण झालेल्या बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख आणि होय हिंदु धर्मात सुद्धा धर्मांतरण केले जात असते. भारतातील जे वैदिक आहेत ते यामुळेच स्वतःला श्रेष्ठ वंश समजतात आणि इतर सर्वांना ते अवैदिक, नास्तिक, शूद्र वंशीय समजतात. अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज यांना सुद्धा ते शुद्रच समजतात ते या अर्थाने.
वैदिक संप्रदाय येण्यापूर्वी भारतात कोणताही धर्म नव्हता. मध्य पूर्व आशियातील लोक सप्त सिंधू प्रदेशाला हप्त हिंदु या नावाने ओळखत असत आणि या प्रदेशातील लोकांना त्यांनी हिंदु हे भौगोलिक नाव दिले होते. मध्य पूर्वेतील सुसंगठीत धर्म ही संकल्पना Persian Empire आणि स्थलांतरित वैदिक समाजाने भारतामध्ये आणली होती. बाहेरून आलेल्या धार्मिक संकल्पना पाहून भारता मधील स्थानिक श्रमण संप्रदायांचे नंतर बौद्ध, जैन असे धर्म निर्माण झाले. बौद्ध आणि जैन धर्मास अवतारी प्रेषित / गुरू आणि राजाश्रय प्राप्त झाल्याने त्यांचा धर्म समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वीकारला आणि त्याचा संपूर्ण आशिया खंडात प्रसार केला गेला. कालांतराने गुप्त राजवटी मध्ये वैदिक संप्रदायास सुद्धा राजाश्रय प्राप्त झाला. बौद्ध, जैन आणि वैदिक व्यतिरिक्त उर्वरित समाज ज्यांना हिंदु हे भौगोलिक नाव दिले गेले होते त्यांचा कागदोपत्री सरकारी कामासाठी हिंदु धर्म अशी नोंद केली गेली.
इतर सर्व संप्रदाय आणि धर्मात प्रवेश करण्यासाठी अनुग्रह, दीक्षा, मुंज, व्रतबंध, सुंता, बाप्तिस्मा वगैरे उपचार करावे लागतात, त्यांचे ठराविक नियम पाळावे लागतात, त्यांचा ग्रंथ प्रमाण मानावा लागतो, त्यांचा एकमेव ईश्वर मान्य करावा लागतो, त्यांच्या एकमेव प्रेषितांना शरण जावे लागते, त्यांचे एकच नवीन वर्ष असते.
हिंदु समाजात मात्र वैदिक व्यतिरिक्त इतरांची मुंज केली जात नाही, जानवे घालून मंत्र दीक्षा किंवा अनुग्रह दिला जात नाही, एकच ग्रंथ प्रमाण नाही की एकच ईश्वर किंवा प्रेषित नाही, कसलेही नियम नाहीत. एकच नव वर्ष दिन नसतो, प्रदेशानुसार नववर्षदीन साजरे केले जातात.
वैदिक समाज त्यांचे वैदिक मंत्र त्यांच्या समाजासाठी वापरतात इतर हिंदूंसाठी ते वैदिक मंत्र किंवा वैदिक पूजा करीत नाहीत. इतर हिंदूंच्या घरच्या आणि शैव - शक्ती मंदिरातील पूजांचे कंत्राट मिळण्यासाठी वैदिकांनी अवैदिक मंत्र आणि अवैदिक पूजा पद्धती विकसित केल्या आहेत. वैदिक पुजारी हे क्षेत्रीय समाजांच्या कुलदेवता - ग्रामदेवता यांच्या पूजा करीत नसतात. विशेष म्हणजे क्षेत्रीय समाजांच्या सण समारंभ आणि मंदिरातील पूजा करताना वैदिक पुजारी हे वैदिक देवतांच्याच पूजा करीत असतात. संस्कृत भाषा आणि त्यामधील मंत्रांचा गंध नसणाऱ्या क्षेत्रीय समाजांच्या लोकांना हि बनवाबनवी कळत नाही.
निधर्मी हिंदु समाज आणि वैदिक धर्मीय पुजारी यांच्या अनेक शतकांच्या सरमिसळ मधून हिंदु धर्म नावारूपास आणलेला आहे. ज्या हिंदु समाजाला हजारो वर्ष धर्माची गरज भासली नाही त्या समाजाच्या पूजा आणि मंदिरे यांची मक्तेदारी मिळविण्यासाठी वैदिक पूजाऱ्यांनी बनावट म्हणजे पौराणिक हिंदु देवता, त्यांच्या पौराणिक सुरस कथा आणि पुरानोक्त पूजा पद्धती विकसित केल्या आहेत. अनेक शतके हि मुद्दाम केलेली बनवाबनवी आता नवीन पिढ्यांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की आता ते या बनवाबनवी प्रकरणाचा अज्ञानातून गर्व मिरवीत आहेत.
गर्व से कहो हम हिंदू है असा अपप्रचार यासाठी केला गेला होता आणि हे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व समजून सहिष्णू हिंदु समाजाला हिंसक स्वरूप दिले गेले आहे. हिंदु समाजाची प्रतीके वापरून हिंदुत्वाचा विद्वेश्युक्त राजकीय अपप्रचार करून सत्तेसाठी हिंदु समाजाच्या श्रद्धेचा गैरवापर केला जात आहे.
हिंदु हा समाज आहे, हिंदु हा धर्म नाही.
हिंदुत्व हा एक राजकीय डाव आहे, ते सत्य नाही.
इतर परकीय धर्म आणि परकीय संप्रदाय प्रमाणे वैदिक संप्रदाय सुद्धा परकीय आहे.
८०% पेक्षा जास्त धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय हे पूर्वीचे हिंदु समाजातील आहेत.
वैदिक, पारशी आणि ज्यू वंशाचे समाज सोडून इतर सर्व समाज हे बहुअंशी मूळचे भारतीय वंशाचे आहेत.
स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांना त्यांच्या राजकारणासाठी आपल्या जातीचा आणि धर्माचा उपयोग करू दिला नाही तर परकीय वंशाचे आणि भारतीय वंशाचे असे सर्व वंशांचे लोक हे भारतामध्ये गुण्यागोविंदाने एकत्रित राहू शकतात, भारताला समर्थ लोकशाहीवादी देश बनवू शकतात.
सर्वात महत्वाचे हे आहे की संपूर्ण मानव समाज हा एकच आहे त्याचे वंश, धर्म, जात यामध्ये मुद्दाम विभक्तिकरण झालेले आहे ते प्रथम अज्ञानातून आणि नंतर स्वार्थासाठी ते वाढत जात आहे.




Comments