आत्मसाक्षात्कार चे तंत्र
जो स्वतःचे खरे स्वरूप जाणतो त्याला सत्य अवस्था ज्ञात होते. म्हणून आत्मसाक्षात्कार ही सत्य आकलन होण्याची गुरुकिल्ली आहे.
वेदांत आणि इतर सर्व धर्म असे म्हणतात की आपला खरा मी हा आत्मा आहे. आत्मा हाच परमात्मा आहे, तोच केवळ सत्य आहे आणि दृश्य जगत असत्य आहे. सर्व सत्य शोधक साधक त्यांची आध्यात्मिक साधना आत्मसाक्षात्कारासाठी करत असतात.
सत्य अवस्था हि नित्य नूतन, सतत बदलत राहणारी असते त्यामुळे तिचे आकलन होताच तिचे सत्य स्वरूप नष्ट होते. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सत्य अवस्थेचे वर्णन केलेले आहे, त्याची मिथके बनविली आहेत, नावे दिलेली आहेत ते सर्व असत्य अवस्थेची वर्णने होतात.
सत्य आकलन होणे हे अशक्य असते म्हणून असत्य काय आहे याच्या आकलनात सत्याचे आकलन स्पष्ट होत जाते.
कोणत्याही गोष्टीचे आकलन होण्यासाठी ती गोष्ट अनुभवात येणे आवश्यक असते. प्रत्येक अनुभवात किमान दोन गोष्टी आवश्यक असतात: अनुभव करणारा द्रष्टा आणि अनुभव म्हणजेच दृष्य.
भौतिक दृष्ट्या द्रष्टा आणि दृष्य हे दोन्ही भिन्न असतात परंतु मानसिकदृष्ट्या ते एक असतात !!!
हे समजून घेण्यासाठी, आपण अनुभवाच्या प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे.
जेव्हा आपली ज्ञानेंद्रिये कोणताही अनुभव करतात, तेव्हा त्या अनुभवाची माहिती ते मेंदूकडे पाठवितात. मेंदू ही माहिती त्याच्या स्मृतीमध्ये साठवतो. या अनुभवाची घोषणा करण्यासाठी स्मृती प्रतिसाद निर्माण करते. हा उद्घोषक म्हणजेच खरा द्रष्टा, आपला स्व, आपला मी आहे.
स्मृतीचा प्रतिसाद हा आपला खरा मी असतो. हा मानसिक मी केवळ इंद्रियांकडून मिळालेल्या आणि स्मृतीमध्ये साठवलेल्या माहितीचे निरीक्षण करू शकतो. द्रष्टा मी स्वत: हा स्मृतीचा प्रतिसाद असतो आणि तो ज्या गोष्टींचे निरीक्षण करतो ते सर्व स्मृती मध्ये साठविलेली पूर्व माहिती असते. द्रष्टा हा स्मृतींची प्रतिक्रिया असतो तर स्मृती मधील माहिती हेच त्याचे दृष्य असते. त्यामुळे आपला मी आणि त्याची माहितीचे दृष्य वेगळे नसते, एकच असते. स्मृतीची प्रतिक्रिया हि नेहमी काही क्षणांनंतर येत असते म्हणजे आपला मी आणि त्याचे सर्व अनुभव हे भूतकाळातील असतात.
मी म्हणजे स्मृतींचा प्रतिसाद होय, त्याचे कार्य एव्हढेच असते की स्मृती मध्ये आलेली माहिती सांगणे आणि लगेच तेथेच थांबणे. परंतु अनुभव समजावून सांगितल्यावर तेथेच तो थांबत नाही, त्याला सतत जिवंत राहायचे असते आणि यासाठी तो सतत नवीन कल्पना तयार करत राहतो आणि सतत विचार करीत राहतो.
मी, ज्याला सतत जिवंत राहायचे आहे, त्याने सर्व भ्रामक, काल्पनिक संकल्पना निर्माण केल्या आहेत.
शून्य अवस्था, संकल्प विकल्प रहित समाधी अवस्था म्हणजे भ्रामक संकल्पनांवर विचार करणे थांबवणे होय आणि केवळ वास्तविक जीवनातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणे होय, जे जसे आहे ते स्वीकारणे. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपला मी (इच्छा, वासना, आशा, आकांक्षा) थांबण्यास सुरुवात करतो.
निसर्गतः सर्व जीवांची काळजी घेतली जात असते परंतु मानवाच्या मी याला म्हणजे मनाला याचे आकलन होणे शक्य नसते कारण ते कधीच सत्य सन्मुख नसते, ते नेहमी भूतकाळात असते.



Comments