संपूर्ण सत्य
डॉ. डेव्हिड बोहम आणि जे कृष्णमूर्ती यांच्या या संवादातून संपूर्ण सत्य जगा समोर आणले गेले आहे.
वैश्विक ऊर्जा आणि मेंदू हे वेगवेगळे आहेत.
मेंदू हा संगणका सारखा आहे कारण तो शारीरिक, मानसिक, रासायनिक, जैविक दृष्ट्या प्रोग्राम केलेला आणि संस्कारित केलेला आहे.
आत्मा हा सत्य नसून तो मेंदूवर झालेल्या मानवी संस्काराचा भाग आहे. मानवी मेंदूवर झालेल्या संस्कारामुळे जगाचे अतोनात नुकसान होत आहे. मेंदूवर झालेले मानवी संस्कार हीच मानवी चेतना आहे. मानसिक काळ हा स्वतः संस्कारित मेंदूचाच एक भाग आहे.
काहीतरी बनण्याचा सततचा प्रयत्न हा एक मानसिक भ्रम आहे आणि भ्रम हा कालबद्ध असतो.
मानवी चेतने मध्ये परिवर्तन आणण्यासाठी काळ आधारित योग किंवा ध्यानासारखी कोणतीही पद्धती आपणास मदत करू शकत नाही.
जोपर्यंत मेंदू संस्कारित आहे तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही.
जी वैश्विक ऊर्जा आहे ती अविभाजित आहे, मानवी विचारांनी संस्कारित नाही, तिचा मानवी शरीर आणि मेंदूशी काहीही संबंध नाही.
जी वैश्विक ऊर्जा मानवी विचारांनी संस्कारित / कलुशित झालेली नाही ती नेहमीच मुक्त असते.
वैश्विक ऊर्जा हि परमशांत अवस्था आहे आणि तिचे असिमित असे (space) क्षेत्र / अंतर आहे. मानवी विचार हे दोन बिंदूंमधील अंतराचा भ्रम निर्माण करू शकतात. मानवी विचारावर आधारित अंतर म्हणजे वैश्विक अवकाश नव्हे.
वैश्विक ऊर्जेचा मानवी मेंदूशी संबंध हा अतिशय मर्यादित स्वरूपाचा असतो.
अंतर्दृष्टी हि वैश्विक ऊर्जेचा भाग असल्याने तिच्यामुळे मेंदू बदलू शकतो. जेव्हा मेंदू हा आत्मकेंद्रित / स्वार्थी नसतो तेव्हा तो वैश्विक ऊर्जेचे साधन बनू शकतो.
मानवी अनुभव, माहिती, विचार हे मर्यादित मेंदूचे भाग आहेत म्हणून ते सर्व मर्यादित असतात.
विवेक, करुणा, प्रेम हे वैश्विक ऊर्जेचे भाग आहेत. ते सर्व एकमेकांशी निगडित आहेत.
जे मानवी मेंदू हे धार्मिक श्रद्धा स्थानांशी जोडलेले आहेत ते दयाळू असू शकत नाही, ते इतरांवर प्रेम करू शकत नाही आणि ते विवेकी सुद्धा असू शकत नाही.
परमशांत वैश्विक ऊर्जा आणि मानवी मेंदू यांच्या मध्ये संपर्क तेव्हाच शक्य आहे जेव्हा मेंदू शांत असतो. परम शांत वैश्विक ऊर्जा हि शांत मेंदूद्वारे मानवी जगात कार्य करू शकते.
मानवी संस्कारांनी प्रदूषित केलेला मेंदू हा पवित्र आणि मंगल ऊर्जेशी कसा जोडू शकतो? ध्यानाद्वारे?
जेव्हा आपण जाणीवपूर्वक काहीही करतो, तेव्हा ती विचाराची कृती असते. जाणीव पूर्वक केलेले ध्यान हा विचार प्रक्रियेचा एक भाग असल्याने ते मेंदूला शांत करू शकत नाही. ध्यान हे केवळ मेंदूला एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेशी जुळवून देऊ शकते. ध्यान म्हणजे एकाग्रता नाही आणि ध्यान करताना विचार चालत नाही.
जोपर्यंत काहीतरी बनण्याची इच्छा असते, तोपर्यंत ध्यान किंवा मौन शक्य होत नाही.
जेव्हा मी पणा नसतो तेव्हा ध्यान असते. असे ध्यान हे मेंदू आणि ऊर्जा यांच्यातील संपर्क बिंदू आहे.
जेव्हा विचारांची लुडबुड नसते तेव्हा धारणा बनते. जेव्हा धारणा असते तेव्हा बोध होतो. जेव्हा ध्यान आणि धारणा असते तेव्हा विवेक बुद्धी असते. जेव्हा मेंदू शांत असतो तेव्हा फक्त ध्यान आणि त्याद्वारे सत्याचे आकलन शक्य होते.
वैश्विक ऊर्जेच्या संपर्कात येणारे काही मोजके मेंदू सुद्धा संपूर्ण मानवी चेतना बदलू शकतात.
वैश्विक ऊर्जा हि अमर्यादित आणि शुद्ध आहे तर मेंदू हा अत्यंत मर्यादित आहे. म्हणून जे मोजके मेंदू अमर्याद ऊर्जेचे भाग बनतात तेव्हा ते इतर मेंदू बदलू शकतात.



Comments