top of page

अखंड सावधानता

Oct 6, 2022
2 min read

मी हा अतिशय खोलवर रुजलेला भ्रम आहे. अनेकांना याचा पत्ताच नसतो. हा जो भ्रामक, असत्य मी आहे तो स्वतःच आपला मालक बनतो. आणि जेव्हा मी हा मालक असतो तेव्हा आपले अस्तित्व बेसावध झालेले असतो. बेसावध क्षण हे झोपेसारखे असतात. भ्रामक मी हा झोपेतील स्वप्नासारखे सतत भविष्यकालीन स्वप्न पाहत असतो. 


मी म्हणजे काय आहे हे जाणून घेण्यासाठी, आपल्या मी पणाची संपूर्ण हकीकत समजून घेण्यासाठी आपणाला निरपेक्ष निरीक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण मी या भ्रमात आपला समाज, आपले नातेसंबंध याची सर्व माहिती भरलेली आहे आणि मी आणि ती माहिती एकच असते.


मी आणि त्याचे अज्ञान, माहिती संग्रह हे सर्व भूतकाळातील असल्यामुळे आणि त्याचा वर्तमानाशी संबंध येत नसल्यामुळे वर्तमान आणि भूतकालीन संकल्पना याच्यामध्ये सतत संघर्ष होत राहतो. 

 

नवीन शिकणे म्हणजे जुन्या भूतकाळाची उजळणी, पारायण करणे नसते तर आता वर्तमानात जे चालू आहे किंवा बदलत आहे त्याचे निरीक्षण करणे म्हणजे खरे शिकणे होय. हे निरीक्षण म्हणजे भूतकाळातील माहिती आणि त्यावर आधारित प्रतिक्रिया नसते.


आणि जर आपण निरपेक्ष निरीक्षण केले नाही तर आपल्या जीवनात संघर्ष अटळ असतो. 


ज्यामध्ये संघर्ष असणार नाही असे जीवन शोधण्यासाठी जीवनामध्ये भूतकाळातील प्रतिमा असता कामा नयेत. 


ज्यावेळी आपण निरपेक्ष निरीक्षण करत असतो त्यावेळी तेथे काळ आणि अंतर नसतात. जेव्हा दृष्टा आणि दृश्य याच्यामध्ये काळ आणि अंतर गायब होतात तेव्हा ते दोन्ही एक होतात. 


सर्व पारंपरिक शास्त्रे हे भूतकाळातील अज्ञान आहेत, आपण सतत त्यामध्ये अधिक भर घालत असतो. मिपणाचे खरे स्वरूप ओळखण्यासाठी निरीक्षण असे हवे की त्याच्यामध्ये विकृती असता कामा नये. आपल्या मी चे निरीक्षण हे नेहमी विकृती असते. मी चे सत्य समजण्यासाठी निरीक्षण हे विकृती विरहित असायला हवे.


सत्याचे आकलन होण्यासाठी केवळ निरपेक्ष निरीक्षणाच्या मागे का लागायचे? 


कारण निरपेक्ष निरीक्षण हे जे अस्तित्वात आहे त्याचे शक्य असते आणि जे अस्तित्वातच नाही त्याचे निरीक्षण शक्यच नसते. त्यामुळे आपल्या जीवनात जे अस्तित्वहीन आहे त्याचा लोप होत जातो आणि ज्याला अस्तित्व आहे तेच शिल्लक राहते. 


Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page