top of page

त्रास आणि दुःख

Nov 12, 2022
2 min read


जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीशी असलेले संबंध हे मृत्यू किंवा इतर काही कारणाने संपुष्टात येतात तेव्हा आपणास त्याचा खूप त्रास होतो, कारण अचानक आपणास एकाकी राहावे लागते. 


दु:ख हे त्या वेगळेपणा किंवा एकाकीपणाचे लक्षण असू शकते. जेव्हा दुस-याशी असलेली आसक्ती संपुष्टात येते, तेव्हा अशा अलिप्ततेसाठी तयार नसलेले मन सतत मानसिक उपाय शोधत राहते आणि अधिक दुःखी होत राहते. 


आपल्या प्रिय व्यक्तीला गमावणे हे वास्तव असते आणि ते आपल्या मनाने कबूल करायला हवे असते. परंतु मनाची तयारी होत नसल्याने आणि बहुतेक ते दैववादी असल्यामुळे गुरू आणि त्याने सांगितलेल्या धार्मिक उपाया मध्ये आधार शोधणे हे भ्रामक असते !


जर आपल्या मनाला दुःखाचे हे मानसिक आणि भ्रामक कारण आकलन झाले नाही तर आपण एका भ्रमातून दुसऱ्या भ्रमाकडे जाण्याचा सतत प्रयत्न करत राहतो.


दुःखात खरंच कोण असते? तो आपला मानसिक मी असतो.  


मनाचे परावलंबित्व आणि इतर गोष्टीत असणारी आसक्ती म्हणजे जीवनाच्या वास्तविक अर्थाचा तो अनर्थ असतो. परंतु अज्ञानामुळे सहसा हे कोणाच्या लक्षात येत नाही. 


परंतु जर एखादी व्यक्ती त्याच्या एकाकी दुःख आणि त्रास यापासून वेगळी झाली नाही, त्या दुःखाबरोबर राहिली तर त्या व्यक्तीचे दुःख आणि त्रास संपूर्णपणे संपू शकतो !!!


अति दुःखात त्या व्यक्तीचा मी, अहं यांचा संपूर्ण नाश झाल्याने त्या व्यक्तीच्या वाट्याला परत दुःख येवू शकत नाही. 


वासना म्हणजे प्रेम नसते. सुख म्हणजे सुद्धा प्रेम नसते आणि जो अनुभव सुखाचा उन्माद देतो ते सुद्धा वास्तविक प्रेम नसते !!!


जे मन दु:खापासून मुक्त झाले आहे तेच खरे प्रेम करू शकते. त्याच्या प्रेमळ व्यक्तीच्या अभावी ते आता सर्वांवर प्रेम करू शकते. आपल्या दु:खाचा अंत होणे म्हणजेच विवेकी बुद्धीची सुरुवात असते आणि करुणा सुद्धा तेथेच असते. करुणा आणि विवेक हे दोघे एकत्र नांदत असतात.


दु:खाचा अंत हा मी या अहंचा अंत आहे आणि तोच त्याचा मानसिक मृत्यू आहे.


जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या कल्पनेशी संलग्न असेल आणि संघर्षाशिवाय, हेतूशिवाय, सहज आणि आनंदाने ते जाऊ देत असेल, तर त्याला शारीरिक मृत्यूची सुद्धा भीती रहात नाही. 


आपले जीवन हे आपल्या जाणिवेने बनलेले आहे, ती सर्व मानवजातीसाठी एकसमान आहे, आपले मन तिला चिकटून आहे कारण त्याला वाटते की त्यामध्ये सुरक्षितता आहे. मानवी जाणिवेच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे आसक्ती.


मी, अहंकार, आपले नाव, आपली कीर्ती हे वास्तव आहे की विचाराने बनविलेले आहे?  


जर ते वास्तविक नसेल आणि विचाराने एकत्र केलेले असेल तर ते आपल्या शारीरिक मृत्यूपूर्वी संपुष्टात येऊ शकते.  विचाराने मी पणाची मानसिक प्रतिमा तयार केली आहे.  जेव्हा विचार संपतो तेव्हा त्याच्या सर्व मानसिक प्रतिमा विरघळतात.  शारिरीक मृत्यू सर्वांसाठी सामान्य आहे परंतु शरीराने जिवंत असताना मानसिक दृष्ट्या सतत मरणे ही एक अद्वितीय घटना असते.


सर्व दु:खाचे कारण असलेल्या मी पणाच्या अंताबरोबर प्रचंड ऊर्जा जीवनात प्रवेश करते आणि तीच खऱ्या जीवनाच्या ध्यानाची सुरुवात असते.




Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page