top of page

दृष्टा आणि दृष्य एक आहे

Oct 15, 2022
6 min read

ADW: जे कृष्णमूर्ती यांची मुख्य शिकवण म्हणजे The thinker is the thought किंवा The observer is observed. It is said that no other world teacher or any spiritual person has never said it before. It is not in Vedas not in Vedanta.

कृपया या विषयावर चर्चा व्हावी ही विनंती


उत्तर: द्रष्टा आणि दृष्य हे एकच आहेत असे सांगणारे कृष्णमूर्ती हे एकमेव आहेत. आणि

याच्या आकलनात सत्य आकलन समाविष्ट आहे. कदाचित सत्य आकलन होण्यासाठी केवळ हाच एकमेव पर्याय उपलब्ध असावा.


हे समजण्यासाठी

द्रष्टा म्हणजे काय?

दृष्य म्हणजे काय?

आणि ते दोघे एक कसे? हे समजून घ्यावे लागेल.


द्रष्टा आणि दृष्य हि संकल्पना वेदांत मध्ये प्रथम आली आहे. त्याचे आकलन झाले तर कृष्णमूर्ती यांचे आकलन सुलभ होवू शकते.


प्रथम वेदांत या विषयी काय म्हणते ते पाहायला लागेल.


वेदांता मध्ये दृक दृश्य विवेक नावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये तीन स्तरावर द्रष्टा आणि दृश्य यांचे विवेचन केलेले आहे.


अध्यात्मामध्ये खरा शोध हा आपला स्वतःचा करावयाचा असतो. मी नेमका कोण आहे? आणि मी याला परंपरेने आत्मा हे नाव दिले आहे. म्हणून आत्मसाक्षात्कार करून घेण्यास अध्यात्मात प्राधान्य दिले जाते.


मी हा खरा दृष्टा आहे आणि जगत हे त्याचे दृश्य आहे अशी पारंपारिक अध्यात्मात कल्पना आहे. आणि ते आत्मा हाच परमात्मा असेही मानतात, या अर्थाने ब्रह्म सत्य जगत मिथ्या अशी वेदांताची सत्या विषयी समज आहे.


खरा मी म्हणजे खरा दृष्टा समजण्यासाठी, वेदांती लोक मीपणाविषयी जे असत्य आहे, जो भ्रम आहे त्याला प्रथम बाजूला सारावे असे सांगत असतात.


मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं|

न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे |

न च व्योम भूमि न तेजो न वायु:|

चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम ||1||


आपले स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे खरा मी नाही. जे जे अनुभवास येत आहे तो मी नव्हे आणि जे कधीही अनुभवास येत नाही ते परमतत्व मी आहे.


मी चे खरे स्वरूप जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार करून घ्या, त्यासाठी साधन शुचित्व, उपासना, साधना, धारणा, ध्यान, निदीध्यास करत रहा, करत रहा....


आपण बघण्याचे उदाहरण घेऊया. बघताना समोरची एखादी वस्तू हे दृश्य आहे आणि त्याला बघणारा मी द्रष्टा आहे. समोरची वस्तू म्हणजे दृष्य हे माहीत आहे परंतु खरा मी द्रष्टा कोण आहे त्याचे आपणास आकलन करून घ्यायचे आहे.


वेदांत असे सांगते की, अनुभव येण्यासाठी द्रष्टा आणि दृश्य हे दोघे आवश्यक असतात. हे दोन्ही वेगवेगळे असतात. यातील दृश्य हे नेहमी बदलत असते तर द्रष्टा हा नेहमी अविचल असतो, त्याच्यात बदल संभवत नाही. तो सतत असतो म्हणून तोच सत्य आहे आणि तेच ब्रह्म आहे. दृश्य म्हणजे जगत ते सतत बदलणारे असते, ते विनाशी असते म्हणून ते मिथ्या आहे.


दृश्य काय आहे याचे ज्ञान असते परंतु खरा दृष्टा कोण आहे याचे अज्ञान असते. आणि या अज्ञानामुळे आपण संसारात दुःख भोगत असतो. त्यामुळे आत्मसाक्षात्कारा नंतर खऱ्या दृष्ट्याचे आकलन होते, मी चे सत्य स्वरूप कळते, ज्ञान प्राप्त होते आणि साधक दुःख मुक्त होतो.


वेदांत अनुसार प्राथमिक स्तरावर जेव्हा आपण समोरची वस्तू पहात असतो तेव्हा द्रष्टा हा देह किंवा देहाचे अवयव असतात का हे पाहूया.


पाहणारा देह किंवा देहाचे अवयव हे हालचाल करणारे आहे, बदलणारे आहे, विनाशी आहे त्यामुळे देह हा खरा द्रष्टा होत नाही.


देह हा खरा दृष्टा नाही याचे आकलन झाले तर मग दुसऱ्या स्तरावर मन हे खरा द्रष्टा आहे काय याची तपासणी वेदांत करते.


मन हे चंचल असते, ते सतत बदलणारे असते, त्याच्यामध्ये वासना - विकार असतात त्यामुळे ते सुद्धा खरा द्रष्टा होऊ शकत नाही.


देह आणि मन हे खरे द्रष्टा नाहीत याचे आकलन झाल्यानंतर मग खरा दृष्टा कोण हा प्रश्न शिल्लक राहतो. कोणीतरी द्रष्टा आहे आणि तो नित्य अनुभवातील देह आणि मन नाहीत.


आपण आपल्या डोळ्यांनी सर्व काही पाहू शकतो परंतु आपले डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत. डोळे स्वतःला पहात नाहीत तरी आपणास डोळे आहेत हे कशावरून कळते? आपणाला दिसत असते म्हणजे आपणास डोळे आहेत हे सिद्ध होते.


या उदाहरणावरून वेदांत असे सांगते की देह आणि मन यांच्या पलीकडे आत्मा आहे आणि तोच खरा द्रष्टा आहे, खरा अनुभवकर्ता आहे. परंतु त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही कारण तोच मूळ दृष्टा आहे, त्याच्यामुळे आपणास अनुभव शक्य होतात आणि हीच त्याची सिद्धता आहे.


वेदांताची ही आत्म्याची संकल्पना त्याचा साक्षात्कार न होता सुद्धा हजारो वर्षे टिकून राहिलेली आहे कारण आत्मा असावा ही आपली केवळ श्रद्धा आहे तो आपला अनुभव नाही.


प्रत्येक व्यक्तीमध्ये - जीवांमध्ये जसा आत्मा आहे तसाच संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा आहे. ही जशी वेदांती संकल्पना आहे तशीच इतर धर्मियांची सुद्धा spirit, soul, god या संकल्पना जवळजवळ सारख्याच आहेत. आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे संपूर्ण मानव समाज हा हजारो वर्षे ज्याचा अनुभव येत नाही त्या मानसिक संकल्पनाचा शिकार बनला आहे.


भ्रम काय आहे याचे आकलन झाले तर मग सत्य काय आहे याचा तपास करणे सोपे होते.


कृष्णमूर्ती यांनी सत्याचे आकलन करून देण्यासाठी वेदांताच्या याच दृक दृश्य विवेक उदाहरणाचे व्यवस्थित तथ्यासहित उकल करून समजावून सांगितले आहे.


वेदांती भौतिक स्तरावरील अनुभवामध्ये दृष्टा आणि दृश्य हे वेगळे असतात असे गृहीत धरून चालले होते.


कृष्णमूर्ती यांना भौतिक अनुभवाचे मानसिक आकलन कसे होते याचे ज्ञान प्राप्त झाले होते, जे पूर्वी इतर कोणासही झाले नव्हते.


वेदांताला भौतिक स्तरावर खरा द्रष्टा सापडलाच नाही त्यामुळे त्यांनी आत्मा नावाची भ्रामक कल्पना मांडली होती.


कृष्णमूर्ती यांना भौतिक घटनांचे आकलन मानसिक स्तरावर होत असते आणि त्यामुळे त्यांना मानसिक स्तरावर खरा द्रष्टा सापडल्यामुळे त्यांनी भ्रामक आत्म्याची कल्पना उडवून लावली.


कृष्णमूर्ती यांनी खरा दृष्टा हा आपला मी आहे, तो स्मृतींची प्रतिक्रिया आहे, तो भूतकाळ आहे, तोच भविष्याच्या कल्पना निर्माण करतो, त्याला वर्तमान कधीच समजत नसतो असे सांगितले होते. त्यांनी केवळ या hints दिल्या होत्या परंतु एकसंघ रीत्या त्यांनी कधी स्पष्ट सांगितले नाही त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा द्रष्टा आणि दृष्य हे कसे एक आहे याचे आकलन होत नसे.


मला याचे जसे एकसंघ आकलन झाले तेच येथे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.


आपणाला जे कळते ते अनुभव आल्यानंतर. अनुभव हे दृष्य आणि अनुभव करणारा द्रष्टा हे दोघे भौतिक स्तरावर वेग वेगळे असतात.


उदाहरणार्थ समोरचे झाड आपण पहात आहोत असे उदाहरण घेवूया. यामध्ये झाड आणि मी स्वतंत्र आहोत, वेगळे आहोत.


मी झाडाला पाहतो तेव्हा माझ्या शरीराचे डोळे त्याला प्रथम पाहतात. डोळ्यांना कळत नसते म्हणून ते झाडाचा फोटो काढून तो फोटो ते मेंदूकडे पाठवितात. मेंदू तो फोटो त्याच्या स्मृती मध्ये साठवितो. स्मृती मध्ये माहिती जाई पर्यंत अनुभव काय झाला याची उकल झालेली नसते. म्हणून स्मृती मधून प्रतिक्रिया उमटते आणि ती प्रतिक्रिया म्हणते की, मी झाड पाहिले आहे.


स्मृति मधून येणारी ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी नामक विचार आहे आणि हाच खरा द्रष्टा आहे.


मी हा स्मृती मधून निर्माण होत असतो, तो स्मृतीचा भाग आहे.


डोळ्यांनी प्रत्यक्ष झाड पाहणे आणि स्मृती मधून त्याची म्हणजे मी ची प्रतिक्रिया येणे यामध्ये काही क्षण गेलेले असतात, त्यामुळे मी हा भूतकाळ असतो.


मी जे पाहतो / अनुभवतो ते नेहमी स्मृती मध्ये साठविलेली पूर्व माहिती असते.


आपल्या उदाहरणातील झाड हे प्रत्यक्ष आहे परंतु मी हा स्मृती मध्ये आहे. डोळ्यांनी काढलेली प्रतिमा मेंदू स्मृती मध्ये पाठवितो आणि स्मृती मधील प्रतिमा मी पाहत असतो. म्हणजे खरे दृष्य स्मृतीत गेल्याशिवाय मी याला दिसत नाही. म्हणजे मी याने प्रत्यक्ष झाड पाहिले नाही, त्याने स्मृती मधील झाडाची प्रतिमा पाहिली आहे. द्रष्टा मी जे दृष्य अनुभव करत असतो ते दृष्य हे स्मृतीत आलेली माहिती असते.


मी हा स्मृतीचा भाग आहे, दृष्य सुद्धा स्मृती मधील माहिती असते. म्हणून द्रष्टा आणि दृष्य हे दोन्ही स्मृती आहेत, म्हणून एकच आहेत.


अनुभव काय होता हे सांगणे एव्हढेच मी याचे कार्य असते परंतु स्वतःला जास्त काळ जिवंत ठेवण्यासाठी मग हा मानसिक मी त्या झाडाला काहीतरी नाव देतो, त्याची अधिकाधिक माहिती पुरवीत राहतो. यासाठी तो असंख्य मानसिक कल्पना बनवीत राहतो.


मी हा स्मृतींची प्रतिक्रिया आहे हे तथ्य आहे.


कृष्णमूर्ती यांनी जीवनातील तथ्य काय आहे याचे आकलन करून घेवून त्याचे सत्य आकलन करता येते एव्हढेच सांगितले होते. त्यांची शिकवणूक हि भ्रमावर नाही तर तथ्यावर आधारित आहे.


सत्य हे इतके साधे आहे परंतु परंपरांनी त्याला भ्रामक स्वरूप देवून त्याचा बाजार मांडला आहे. बाजारात पैसा आहे त्यामुळे सतत नवनवीन विक्रेते येत असतात आणि ते आपणास अपप्रचार करून त्यांचे गिऱ्हाईक बनवीत असतात.


आपल्या स्वतःचे खरे स्वरूप जर आपणास ज्ञात झाले तरच आपण इतरांचे सत्य अवलोकन करू शकतो.


सर्व मानसिक भ्रम नाहीसे झाले तर मग जीवन जगणे सहज आणि सुंदर होते.


कृष्णमूर्ती हे साधकाला ब्रम्ह दाखविण्यासाठी इथ पर्यंत घेवून येतात आणि मग सांगतात,


"बघ येथे काहीच नाही. मी तुला सत्य दाखविले आहे, काय मानायचे आणि काय सोडायचे आता ते तू पहा."


आपले सर्व दैनंदिन अनुभव हे असेच असतात.


आपण म्हणजे आपला मी हा स्मृती मधून प्रतिक्रिया देत असतो. दैनंदिन घटना स्मृती मध्ये गेल्या शिवाय त्यांचे आकलन आपल्या मी यास होत नसते आणि तो पर्यंत ते आपणास समजत नाहीत.


आपण कधीही वर्तमानात नसतो!!!


आपण नेहमी भूतकाळात असतो !!!


आपण नेहमी मी याने बनविलेल्या कल्पनेत जगत असतो !!!


आपले नातेसंबंध बघा आणि ठरवा कि ते प्रत्यक्षातील आहेत की स्मृति मधील आठवणी आहेत?


नवरा आणि बायको या कल्पना मी याने बनविल्या आहेत. प्रत्यक्षात आपण फक्त स्वतंत्र व्यक्ती असतो, आणि हेच तथ्य आहे.


आपण सर्वजण केवळ मनुष्य प्राणी आहोत हे तथ्य पकडले तर नात्यांचा गोंधळ आणि संघर्ष टाळता येईल. दोन धर्मातील, दोन देशातील संघर्ष टाळता येतील. वैयक्तिक संघर्ष ते देशातील युद्धे सर्व टाळता येतील.


आणि भीती म्हणजे तरी काय असते?


साप, त्याचे विष, मृत्यू हि भूतकाळातील माहिती आपल्या मेंदूतील स्मृती मध्ये साठविळेली असते. साप पाहिला की आपला मी त्या पूर्व माहिती अनुसार घाबरतो आणि स्वसंरक्षण साठी त्याला मारायचा प्रयत्न करतो.


स्मृती मधील माहिती वापरली नाही तर आपण साप पाहिल्या नंतर काय करू हे त्यावेळच्या परिस्थिती नुसार सहज घडत असते. साप त्याच्या मार्गाने जाईल, आपण थोडा वेळ थांबू, त्याने हल्ला केला तर आपण प्रतिहल्ला करू वगैरे त्या परिस्थिती नुसार होत असते.


वर्तमान परिस्थितीचें आकलन मध्येच कृती दडलेली असते.


Perception is the action.


वरील सत्य कथन हे माझे नाही ते कृष्णमूर्ती यांचे आहे, ते त्यांनाच समर्पित करतो.


DTT: वेदांताने शोधलेला द्रष्टा म्हणजे आत्मा कसा भ्रामक आहे हे आपण सोपे करून सांगितले. तसेच कृष्णमूर्तींनी आकलन केलेला द्रष्टा ही स्मृतीची प्रतिक्रिया आहे हे वास्तव आपण उलगडून सांगितले. परंपरेतील मानलेला भौतिक द्रष्टा व कृष्णमूर्ती यांनी मानसिक स्तरावरील आकलन केलेला द्रष्टा ह्या दोहोतील मौलिक फरक आपण उत्तम प्रकारे विशद केले त्याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद.


Recent Posts

See All
अखंड सावधानता

मी हा अतिशय खोलवर रुजलेला भ्रम आहे. अनेकांना याचा पत्ताच नसतो. हा जो भ्रामक, असत्य मी आहे तो स्वतःच आपला मालक बनतो. आणि जेव्हा मी हा मालक...

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page